Friday, July 4

मै टल्ली हो गयी...!!

नमस्कार मंडळी,

तुम्ही 'मै टल्ली हो गयी' हे नवे गाणे पाहिले आहे का?
मद्यप्राशनाचा अभिनय करत मल्लिका ष्टेजवर नाचत आहे! सोबत रणवीर शौरीही काही झटके मटके मारत आहे. अहो मल्लिका मंडळी मल्लिका!! बॉलीवूडमधील अनेक नटमोगऱ्यांना जिच्या शरीरसंपदेचा हेवा वाटतो ती साक्षात मल्लिका. एवढे असूनही मल्लिकाला आनंद कसला तर टल्ली झाल्याचा.

आहाहा! अहाहा!! आहाहा!!! मल्लिकाने गाण्यावर काय नृत्य केलं आहे मंडळी. गाण्याचे शब्दही किती अर्थवाही आहेत. मल्लिकासारखी एक दिग्गज अभिनेत्री, रणवीर सारखा विनोदी अभिनेता आणि प्रीतिश नंदी कम्युनिकेशन. काय सांगू मंडळी.

वास्तविक मल्लिकाला अनेक गोष्टींचा आनंद व्हायला हवा. तिचे भूतकाळात अनेक चित्रपट सुपरहिट झाले. साक्षात जॅकी चॅन बरोबर अभिनय(! ) करण्याची संधी तिला मिळाली. मात्र तिला आनंद कसला तर टल्ली होण्याचा!!

तक तक तकना वे
मख मख मख मखना वे

बघा मंडळी लाटानुप्रास अलंकाराचा कसा सुरेख उपयोग केला आहे या ओळींमध्ये! याच अलंकारातले ’चंदू के चाचा ने चंदू की चाची को’ हे एक गाणे तुम्हाला आठवते का मंडळी? तुम्हाला नाही आठवणार ते. त्यासाठी माझ्यासारखा अभ्यास हवा मंडळी. पण ’चंदू के चाचा ने’ मधील अनुप्रास आणि ’तक तक तकना वे’ मधील अनुप्रास यामध्ये सूक्ष्म फरक आहे. ’तक तक तक’ अशी पुनरावृत्ती झाल्यामुळे गाण्याला एक आंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आमच्या कोकणातल्या वळणावळणाच्या रस्त्यांवर गाडी चालली की आमचे शरीर असे आंदोलित होते मंडळी.

पतियाळा पेग लगाके
तेरी गली विच आके
सब सूझबूझ होश गवाके
दीवानी मै पागल

ह्या ओळी बघा मंडळी. चित्तरंजन एका कवितेत म्हणतात ’तुझ्या शहरात मी आलो, खुळ्यागत भांडणे झाले. ’ तर इथे मल्लिका म्हणते 'तुझ्या गल्लीत मी आले आणि पतियाळा पेग लावला’.

मंडळी तुम्ही कधी पतियाळाला गेला आहात का? काय सांगू मंडळी पतियाळातल्या जुन्या दर्ग्याच्या मागे काय उत्तम मटण बिर्याणी मिळते. यम जर माझ्याकडे आला तर त्याच्या रेड्यावर डब्बलसीट बसून मी त्याला पहिल्यांदा पतियाळ्यातल्या जुन्या दर्ग्याच्या मागे मिळणारी बिर्याणी खायला घेऊन जाईन. घे लेको! खा म्हणेन. थांबा तुम्ही लगेच कल्पनाविलास करायला लागलात का? अहो मी हे यमाला म्हणतोय. त्याच्या रेड्यालाही पतियाळातल्या गोंडस म्हशी बघायला मिळतील. मात्र तुम्ही आपल्यासमोरचा वरणभात मुकाट्याने खा!

आणि मंडळी इथे विच हा शब्द पाहिला का तुम्ही. अहो विच म्हणजे चेटकीण नाही काही. तुम्हाला आमची मल्लिका काय चेटकीण वाटते का? साक्षात अनुष्कानेही तिचा हेवा करावा अशी अप्सरा आहे ती. विच हा एक बोलीभाषेतला शब्द आहे मंडळी. सोकॉल्ड सभ्यतेची आणि संस्कृतीची झूल मिरवणारे लोक या शब्दाला नाक मुरडतील. पण ’विच’ ची मजा कशाविच आहे का मंडळी? अहो संस्कृती आणि सभ्यता ह्या गफ्फा आहेत हो सगळ्या गफ्फा!

आणि मंडळी तुम्ही शेवटची ओळ काळजीपूर्वक वाचली का? ’सब सूझबूझ होश गवाके’. अहो मंडळी तुकोबांनी तरी वेगळे असे काय म्हटले आहे?

भक्तिरसामध्ये डुंबणाऱ्या तुकोबांना जसे "काय सांगो झाले काहीचिया बाही? पुढे चाली नाही आवडीने" असे वाटते. तसेच सोमरसामध्ये डुंबणाऱ्या मल्लिकाला ’सब सूझबूझ होश गवाके । दीवानी मै पागल" असे झाले आहे.

मै टल्ली हो गयी
मै टल्ली मै टल्ली मै टल्ली हो गयी

अहाहा! अहाहा!! या ओळी ऐकताना तुमच्या अंगावर शहारे आले नाहीत का मंडळी? या गाण्यावर मल्लिकाने कमरेला मारलेला झटका किती हळवा आहे मंडळी. अगदी जीव एवढासा होतो!

आणि काय नेमके शब्द वापरले आहेत इथे. ’मै टाईट हो गयी’ किंवा ’मै टुन्न हो गयी’ असे न म्हणता ’मै टल्ली हो गयी’ असे मल्लिका म्हणते मंडळी. अहो टल्ली ची नजाकत ’टाईट’ किंवा ’टुन्न’ मध्ये आहे का मंडळी? शिवाय मल्लिका आधीच इतकी टाईट आहे की तिला अजून टाईट व्हायची काही गरजच नाही. तिच्याबाबत मी जास्त काही बोलत नाही. अहो नाहीतर शरीराप्रमाणेच मनालाही कुबड आलेली मंडळी अश्लील अश्लील म्हणून ओरडायची!!

आणि हो! टल्ली हा शब्द ’तल्लीन’ या शब्दाशी किती जवळीक साधणारा आहे! अहो अनेक कट्ट्यांवरही लोक काय करतात. तर साहित्यप्रेमामध्ये, गप्पाटपांमध्ये तल्लीन होतात. हा आता काही करड्या जिभांचे लोक याला कंपूबाजी करून टल्ली होणे म्हणतील पण तो त्यांच्या ऱ्हस्वदृष्टीचा दोष आहे मंडळी. अहो साहित्यसेवा म्हणजे तरी काय? शिवास रीगलचे दोन पेग लावून कळफलक बडवणे हीच तर खरी साहित्यसेवा आहे मंडळी. आणि आपल्या आवडत्या स्त्रीसोबत मावळत्या सूर्याच्या साक्षीने समुद्रकिनाऱ्यावर दोन पेगांचा आस्वाद घेत टल्ली होणे हेच खरे प्रेम!! सोबत मोबाईलवर टल्ली गाणे जर चालू असेल तर दुधाच्या सायीत साखरंच!!

मंडळी, केवळ सोपे शब्द आणि मल्लिका यांच्या जोडीने या गाण्याला काय अप्रतिम उंची प्राप्त होते हे तुमच्या लक्षात आलंच असेल. असो मंडळी, एखाद्या वरवर अगदी साध्या वाटणाऱ्या गाण्यातदेखील काय विलक्षण ताकद असू शकते याचं हे गाणं म्हणजे उत्तम उदाहरण आहे. हे गाणं ऐकलं (आणि विशेषत: पाहिलं) की मन बेचैन होऊन जातं. सोनेरी पारदर्शक रंगाच्या द्रवामध्ये बर्फ बुडावा तसं ते स्वप्नामध्ये बुडून जातं आणि आपण गुणगुणू लागतो.
मै टल्ली हो गयी मै टल्ली हो गयी!!

-- आजानुकर्ण पुणेकर

Tuesday, June 24

निषेध

मा*. कौतिकराव ठाले पाटील साहेब,

लिहिन्यास अत्यंत दुक्ख व्हते की तुम्ही म्हराटी साहित्य स्म्मेलन ह्ये यूयेस मधी (म्हंजी आमेरिकेत) घ्येन्याचे ठरिवले हाये आसे आम्हास कळले हाये.

ह्या निर्नय घेऊन आम्च्यासारख्या समस्त धंदेवाईकांना तुम्ही मधलं बोट दाखिवलंय. ह्या निर्नयाचे आमास्नी आजाबात कौतिक वाटत न्हाई. खालच्या साईडला डाव्या हाताचा आंगठा छापून आम्ही तुम्चा हिते जाहीर लेखी निशेध करत आहोत.

--


आजानुकर्न पुनेकर
सही निशानि डाव्या हाताचा आंगठा

( केटरिंग, खुर्च्या, गाद्या, गिरद्या, पडदे, ष्टेज, लाऊस्पीकर, वडापाव व चहाच्या गाड्या यांचे होलसेल एजंट - साहित्य स्म्मेलन स्पेशालिष्ट)

ता.क. १:
* मा. = माननीय.
उगीच धावती** गाढवं आंगावर घेन्याची आजाबात विच्छा न्हाई.

ता.क. २:
**धावती गाढवं: "धावती गाढवं" हे येका मराठी (व त्याच्या मुळंच पुने, स्यानफ्र्यांसिस्को वगैरे जागतिक म्हराटी ठिकानी जगप्रसिद्ध आसलेल्या) वाक्प्रचाराचे इम्प्रोव्हायझेषन हाये!

Wednesday, June 18

लावूनि कोलीत । आपुला करितील घात ॥

भले शाब्बास संजय राऊतसाहेब. या लेखात तुम्ही सनातनवाल्यांची फुलटूच केलेली वाचोन आम्हास परमसंतोष झाला आहे.

अहो मिशा चिकटवोनी का कोणास मावळा होता येते? जे कृत्य करण्याचे लायसन फक्त शिववडावाल्यांना आहे ते कृत्य असे ऐर्‍यागैर्‍यांनी स्वत:च्या शिरावर घेतले की त्यांची मानगूट मोडोन त्यांचा फजितवडा होणार हे तर विधिलिखितच आहे.

बॉम्बस्फोट झाल्यावर आमचे (आणि तुम्ही ज्यांना तीनचारदा गारद केले आहे त्या बोरूबहाद्दर दाढीवाल्या वागळ्यांचेही) हेच मत होते की सनातनवाल्यांनी हिंदूंची इज्जत घालवली. कितीदा सरळ केले तरी वागळ्यांच्या दाढीचे केस वाकडेच! साल्याला एकदा खोपच्यात घेवोनी काही समज देणे तुरंत गरजेचे आहे.

आपले 'हिंदूंची इज्जत जाण्याचे कारण बॉम्बस्फोट हे नसून स्फोटासाठी वापरलेले बॉम्ब फुसके होते' हे नेमके वाक्य वाचून आम्ही वागळ्यांना विसरोन सेनेविषयीच्या अभिमानाने आमचा ऊर भरोनी आला आणि बाराबंदीचे तीन बंद तुटले. असो. धर्मासाठी (दुसर्‍यांचे) प्राण हाती घेणार्‍या मराठ्यांच्या राज्यात तीन बंदांची काय किंमत.

आजकाल आम्ही आपल्य पेप्रामध्ये असेही वाचत आहोत की सर्वत्र गनिमांनी धुमाकूळ घातला आहे. हिरव्या आक्रमणामुळे अवघे स्वराज्य हातातून जाते की काय अशी कंडिशन आलेली आहे. तुम्ही असेही लिहिता की काटेसे काटा निकालना चाहिये!

या आक्रमणाला हिंदुत्त्वाच्या वज्रमुठीनेच जवाब देवोन अवघ्या राज्यात भगव्याच्या शिलेदारांच्या तोफा धडाडल्या पाहिजेत, बॉम्बचे स्फोट झाले पाहिजेत. मात्र मुठीचा एकमेव उपयोग बोंबा मारणे एवढेच ज्या नामर्दांना ठाऊक आहे त्यांचे डोळे उघडो न उघडो मात्र आमचे डोळे साफ उघडले आहेत. हिंदूंनी जिहाद पुकारण्याची वेळ आली आहे.

गुस्ताखी माफ असावी पण आम्हालाही एक सूचना करावीशी वाटत आहे. हर एक गावातील आपल्या छावण्यांमध्ये शिवबॉम्ब बनवण्याचे कुटीलोद्योग चालू करावेत. याच देशातल्या परप्रांतीय गनिमांनी गावोगाव मराठी माणसाचे धंदे हिसकावोन स्वत:चे बस्तान बांधले आहे. त्यांना यवन आणि म्लेंच्छही सामील आहेत. हे स्वराज्याविरोधातले मोठेच कारस्थान आहे. मात्र येकवार शिवबॉम्बचे बार सुरु झाले की बेरोजगार हिंदू मराठी तरूणांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होवोन सर्वत्र आबादीआबाद होईल व हिरव्या गनिमांना पळता भुई थोडी होईल. 'शिवबॉम्बचे बार' मधील 'बार' या शब्दाला आबा डोळे वटारतील. मात्र असे गाजरपारखी स्वराज्यात असायचेच. त्यांनी ज्यास्ती तकलीफ दिली तर 'स्फोट' म्हणा येवढेच आमचे सांगणे.

मात्र तुम्ही लेखामध्ये टिळकांचे नाव घेतलेले मात्र आम्हास पसंत नाही. ही अशी नावे वाचून आम्हाला चकण्यात खौट वाटाणा यावा तसे होते. बॉम्ब बनवायचे सोडोन उगीच बोरू घासत बसण्याचे काम करणार्‍या मंडळींना ज्यास्ती महत्त्व देणे काय कामाचे? आम्ही तर म्हणतो त्यांनी देखील हिंदूंची इज्जतच घालवली होती. नशीब चांगले की या महाराष्ट्रभूमीत शिवरायांच्या नावाने एक सेना (आणि नंतर वडा) निर्माण झाला आणि गेलेली इज्जत थोडी का होईना परत आली. सगळी इज्जत परत आणायची असेल तर शिवबॉम्बचे तेवढे मनावर घ्यावे!

तसे झाल्यास आम्ही आपणास ग्यारंटी देतो की येत्या निवडणुकीत आम्ही बॉम्बचेच सॉरी धनुक्ष्यबाणाचेच बटण दाबतो.

Thursday, May 29

भाषाशुद्धीचे खूळ आणि जडजंबाल लेखन

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त भाषाशुद्धीकरणाच्या विषयाची पुन्हा एकदा उजळणी झाली. माझे मित्र चित्त यांनी काही दिवसांपूर्वी गप्पा मारताना मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे लेखन वाचा असे सांगितले होते. राजाध्यक्षांच्या 'भाषाविवेक' या पुस्तकातील हे काही निवडक उतारे भाषाशुद्धीचे खूळ उतरवतील का?

मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ १९व्या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते. शेवटी आपले लेखन ज्यांच्यासाठी त्या लोकांना ते कितपत समजेल ही शंका आड आली असणार. पण भाषाशुद्धीकरणाची चळवळ थंडावली, तिचे उघड उद्योग संपले, तरी आपल्या स्वातंत्र्यचळवळीच्या भाषेत ती 'भूमिगत' झाली. परिणामी ती कीड लागल्या प्रमाणे पसरली. बर्‍याच लेखनाच्या मुळांना ती कीड लागली. अनेकदा त्या लेखकांच्या नकळत! आणि 'शिष्ट' लेखकांमुळे ती लागण स्वत:ला लेखक न समझणार्‍या वाचकांपर्यंत पोचली. कृत्रिम, अर्थहीन आणि जडजंबाल लेखन त्यांना तसे वाटेनासे झाले. आपल्या भाषेबाबतची संवेदनाच क्षीण झाली आणि ती पुढे नष्ट झाली.

या भाषाशुद्धीचळवळीचे प्रणेते त्या काळी नावामागे बॅ. हा बॅरिस्टर या इंग्रजी पदवीचा संक्षेप लावणारे आणि आता 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी लावले जाणारे वि. दा. सावरकर. या भाषाहोमात भस्म करायचा संकल्प होता तो मराठीत आलेल्या फारसी व इंग्रजी शब्दांचा. या संकल्पामागची चेतना राजकीय होती, तशीच ती धार्मिकही. पण राजकीयपेक्षा मुख्यत्वे धार्मिक. एक तर इंग्रजी शब्द लेखनात येत ते तुलनेने फारच थोडे. फारसी कुळीतलेच फार. आणि इंग्रजी शब्द जेमतेम शतकभरात आलेले तेवढेच. मात्र फारसी शब्द कित्येक शतके ठाण मांडून बसलेले. अगदी शिवशाहीपूर्वीपासून. आणि एवढे एकजीव झालेले की तीक्ष्ण नाकाचे व्युत्पत्तिशोधक सोडल्यास ते शब्द परके आहेत याचा वाचणार्‍यांना, लिहिणार्‍यांना, वापरणार्‍यांना संशयदेखील येऊ नये.

पण ही शुद्धीकरणाची चळवळ जोरात आल्यावर काही घ्राणेंद्रिये (म्हणजे देशी भाषेत नाके) अधिकच तिखट झाली. आणि हाय खाल्लेल्या म्लेंच्छ सैनिकांना जळीस्थळी संताजी व धनाजी दिसू लागले तशी या शुद्धीसैनिकांना म्लेंच्छ व यवनी शब्द दिसू लागले. या सर्वच सैनिकांना भाषाशास्त्राची तालीम (हा देखील एक म्लेंच्छ शब्दच) मिळालेली होती असे नाही. तिची भरपाई करायला भाषाभिमान समर्थ होता!

पुढे आपले एक मोठे कवी माधव जूलियन यामध्ये उतरले. फारसीचा विटाळ झालेल्या अनेक कविता त्यांनी संस्कृतच्या फवार्‍यांनी सोवळ्या करून घेतल्या. याशिवाय भाषाशुद्धीकरणाचा प्रचारही केला. मात्र पुढे १९१७ मध्ये त्यांनी आपल्या एका पत्रात लिहिले "संस्कृत शब्दांची निष्कारण गर्दी निषेधार्ह आहे. या लोकांना संस्कृत भाषा अवगत असावी. पण स्वत:च्या मराठी भाषेशी नीट परिचय नसावा याची कीव येते! बोलीतील सुलभ शब्दांकडे आपले दुर्लक्ष होते." १९२१ साली त्यांनी "प्रत्येक मराठी शब्दाचे संस्कृतशी नाते जोडण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न धिक्कारला."

अर्थात हे शुद्धीकरणाचे खूळही संपूर्णत: देशी नाही! साहेबाला त्याने आधी पछाडले होते. पहिल्या महायुद्धानंतर, इंग्रजीतील 'नेटिव' (ऍंग्लो सॅक्सन कुळातले) शब्द कटाक्षाने वापरून फ्रेंचद्वारा आलेल्या लॅटिन कुळीतल्या व तशा शब्दांना नाकारायचे अशी टूम निघाली होती. भाषा साधी सोपी करावी हा त्यामागचा हेतू. आपले शुद्धीकरण मात्र त्याच्या अगदी उलट जाणारे.

भाषाशुद्धीचा हा आग्रह प्रामुख्याने हिंदीच्या प्रगतीलाही भोवला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय व्यवहाराला सोयीची
म्हणून वापरल्या जाणार्‍या इंग्रजीचा वरचष्मा उतरवण्यासाठी तिच्याजागी कोणती भाषा आणायची असा प्रश्न पडल्यावर संख्याबळाच्या आधारावर हिंदीची वर्णी लागली. पण कोणती हिंदी? गांधीजींचा कौल पडला साध्या सोप्या 'खडीबोली'च्या बाजूने . मात्र पंडित मालवीयांसारख्या काही पुढार्‍यांच्या हिंदीच्या पुनरुज्जीवनवादी संस्कृतीकरणामुळे, तापलेल्या धर्मनिष्ठेमुळे. भावी सत्तेच्या गाजरामुळे, संस्कृतचे रंगरोगण केलेल्या हिंदीची घोडदौड सुरू झाली. सत्ता आल्यावर हिंदीच्या उद्धारासाठी पैशांची लयलूट झाली. इतर भाषांच्या वाट्याला कंजूष भिक्षा आली.

डॉ. कालेलकर यांच्या 'भाषा आणि संस्कृती' या विद्वत्ता, स्पष्टवक्तेपणा आणि विषयोचित विनोद यांच्या मेळाने फार वाचनीय झालेल्या पुस्तकातील काही वाक्ये इथे देतो. "इंग्रजीपेक्षाही कठीण अशी ही शुद्ध नवमराठी कित्येकदा इतकी दुर्बोध आहे की ती कळण्यासाठी ती ज्या मूळ इंग्रजीचे भाषांतर आहे तिकडे वळल्यावाचून गत्यंतर नसते... लोकांच्या माथी एक अगदी नवी, बोजड भाषा मारण्याचा जो प्रयत्न झाला तो फसला... 'सरकार' हा शब्दच पाहा. कोट्यवधी लोक अगदी सहजपणे हा शब्द वापरतात. मात्र त्याच्या जागी संस्कृतातून आलेला 'शासन' हा शब्द! मग त्याला साथीदार म्हणून 'शासकीय' 'प्रशासनिक' हे शब्द... 'सरकारी छापखाना' असे म्हणताच अंगावर सांडपाणी पडले असे वाटणार्‍या लोकांनी 'शासकीय मुद्रणालय' हा शूचिर्भूत पवित्र प्रयोग चालू केला आणि मराठीपासून सामान्य जनता कशी दुरावेल याची काळजी घेतली.

भाषेच्या बाबतीत शुद्धीकरण ही शास्त्रबाह्य कल्पना आहे. धर्माभिमान, खोटा स्वाभिमान, उच्चनीचतेच्या कल्पना... स्वत:ला श्रेष्ट न समजणार्‍या वर्गाची भावना अशा कारणांमुळे लोक शुद्धीकरणाकडे वळतात. "

याउलट गुजरातेतील बडोदे संस्थानात एके काळी मराठी व इंग्रजी या कारभाराच्या भाषा होत्या. त्याऐवजी लोकांची भाषा गुजराती ही कारभारासाठी वापरण्याचा गायकवाडांनी निर्णय घेतला. आणि त्यातील परभाषिक फारसीसारखे शब्द काढण्याचा अडाणी खटाटोप न करता कारभार व्यवस्थितपणे चालला.

पण सयाजीरावांच्या या विचारावर एका शुद्धीकारक मराठी पंडिताने आक्षेप घेतला म्हणे: "गुजराती ही क्षुद्र भाषा! मराठीत मुखकमल, चरणकमल असे म्हणतात. पण गुजरातीत तसे काही नाही!"

मराठी भाषा 'उच्च' करण्याची केविलवाणी धडपड ज्यांनी आरंभली त्यांनी तिला घसरणीला लावले. उदा हे काही शब्द पहा: रेडिओला सांवहिक. वनस्पतिशास्त्राला: औद्भिदशास्त्र. लंबगोलाला: विवृत्ताकृति. 'अवलंबनपर्णोद्गमसूत्र हा जबडातोड शब्द कशासाठी वापरला आहे कोण जाणे! एका विदुषीने Honeysuckle या शब्दाला सामान्य माणसे वापरत असलेल्या 'फुलचुखी' या सोप्या शब्दाऐवजी मधुचोष्यक हा शब्द सुचवला. :D

Thursday, April 24

रेडिओ मिरची आणि संत तुकाराम

रेडिओ सिटी सुरू झाल्यामुळे आता रेडिओ मिरचीचे खंग्री बूच लागले आहे. वैतागलेला श्रोतावर्ग टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी त्यांची कंबर कसून प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे 'मराठी' गाणी ऐकवणे हा!

खरं म्हणजे रेडिओ मिरचीवर मराठी गाणी सुरू झाल्याचे मित्राकडून ऐकल्यावर मी बेशुद्ध पडलो होतो. पण चप्पल हुंगवणे, नाकाला कांदा लावणे वगैरे प्रकारांऐवजी रेडिओ मिरची मला ऐकवल्यावर परत शुद्धीवर आलो. नंतर आत्मक्लेश सहन करून एक पूर्ण दिवस रेडिओ मिरचीची गाणी ऐकली पण त्यात मराठी गाणं कुठंच ऐकायला मिळालं नाही.

थोडं खोदून खोदून चौकशी केल्यावर कळलं की सकाळी ५ ते ७ या वेळात 'काही' मराठी गाणी ऐकवली जाणार आहेत. अधिक खोलात गेल्यावर असंही कळलं की रेडिओ मिरचीची आधीची योजना ही रात्री १ ते ३ किंवा रात्री ३ ते पहाटे ५ या वेळात मराठी गाणी प्रसारित करण्याची होती. पण या वेळामध्ये काही गुरखे, रात्रपाळीवरचे कामगार वगैरे जागे असतात. मात्र पहाटे ५ ते ७ या साखरझोपेच्या काळात एकही माणूस जागा असणार नाही याची त्यांनी खात्री करून घेतली. विशेषत: इतक्या उन्हाळ्यात पहाटे जरा गार हवा असल्यावर चांगली झोप लागते तेव्हा ५ ते ७ ही ओळ गाण्यांच्या प्रसारणासाठी उत्तम.

असो.

भणभण गाणी, उबगवाण्या संतापजनक जाहिराती आणि तोंडशिंदळीचे निवेदक असल्यावर रेडिओ मिरची स्वत:हून ऐकणार्‍यांबद्दल काही ठेवणीतले शब्द वापरता येतील. पण मराठीच्या टवाळ्या करून हिंदीच्या चोळ्या धुणार्‍या या तुंग्रुस रेडिओ मिरचीवाल्यांबद्दल आमच्या तुकोबांनी एक अभंग आधीच लिहून ठेवला आहे. आम्हाला तो अभंग फार्फार आवडतो.


संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥
संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥

वा!

खरं तर गुटखासंप्रदायी थुंकसैनिकांनी एखादे निषेधात्मक पाणीदार आंदोलन जाहीर करायला पाहिजे.